६/२३/२०१४

डोंबिवलीत प्रदूषण नाही!

Pollution


डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या हजारो लोकांचे आरोग्य येथील प्रदूषणकारी कारखान्यांमुळे धोक्यात आलेले असले, तरी डोंबिवलीत अजिबात प्रदूषण नाही, असा धक्कादायक दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सन २००९मध्ये केलेल्या सर्वेक्षणात प्रदूषणाच्या बाबतीत डोंबिवलीचा दुसरा क्रमांक लागत असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या नव्या दाव्यामुळे आता डोंबिवली प्रदूषण मुक्त झाली असे म्हणायचे का, असा उपरोधिक सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

एमआयडीसी परिसरातील काही भागांत जानेवारीत आणि जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे हिरवा रंग पसरला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. त्यानंतर नियमांचा भंग करून व्यवसाय करणाऱ्या एमआयडीसीतील ४४ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली होती. गेल्या आठवड्यात डोंबिवलीत पुन्हा हिरवा पाऊस पडला. ओंकार इंजिनीअरिंग या रंगाच्या कंपनीवर मंडळाने ठपका ठेवला आहे. कंपनीतून रंगाची आयात-निर्यात करताना योग्य काळजी येत नसल्याने रस्त्यावर तो रंग पडतो आणि पाऊस पडल्यानंतर पाणी हिरवे होते, असा निष्कर्ष मंडळाने काढला आहे. कंपनीवर कारवाई करून एमआयडीसीने आता आपले हात वर केले. तर, हे रासायनिक प्रदूषण नसल्याचा दावा प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असून, त्या हिरव्या पावसाचे स्पष्टीकरण देण्यासाठी मंडळाने कल्याण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांच्या सहीने एक पत्र काढण्यात आले आहे. त्यात डोंबिवलीत प्रदूषणच नसल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

कारखान्यांकडून नियम धाब्यावर

डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या रासायनिक कारखान्यांतून निघणाऱ्या केमिकलवर कोणतीही प्रक्रिया न करता ते नाल्यात आणि हवेत सोडले जाते. घातक रसायन मिश्रित सांडपाण्यातील बीओडी आणि सीओडी कमी करून ते नाल्यात सोडण्याची अट अनेक कारखाने धाब्यावर बसवतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search