५/२०/२०१४

आपले सरकार गरिबांना समर्पित - नरेंद्र मोदी


आपले प्रस्तावित सरकार देशातील गरिबांना, युवकांना आणि महिलांना समर्पित असल्याचे प्रतिपादन देशाचे होऊ घातलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये केले. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय पक्षाची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. या बैठकीत मोदींची संसदीय पक्षाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. या बैठकीत उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना मोदींना आपल्या सरकारची दिशा काय असेल, हे स्पष्ट केले. 
मोदी म्हणाले, देशातील सामान्यातील सामान्य माणसामध्ये नवा आत्मविश्वास या निवडणुकीमधून निर्माण झाला आहे. लोकशाहीवरचा त्यांचा विश्वासही वाढला आहे. याच व्यवस्थेतून आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो, असाही विश्वास सामान्यांमध्ये निर्माण झाला आहे. आपले सरकार देशातील गरिबांना, युवकांना आणि महिलांना समर्पित असेल. देशातील सव्वाशे कोटी लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व आपले सरकार करेल. 
देशातील भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे आणि पाच पिढ्यांच्या तपस्येमुळे पक्षाला यश मिळाल्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले, आता आपल्याला सज्ज व्हावे लागणार आहे. प्रत्येकाला समर्पित वृत्तीने काम करावे लागणार आहे. जर निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्त्वात आली असती, तर तो केवळ सत्ताधाऱयांविरोधातील जनादेश असल्याचे आपण म्हणू शकलो असतो. मात्र, देशवासियांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे याचाच अर्थ त्यांनी आपल्यावर विश्वास टाकून मतदान केले आहे. त्यामुळे जबाबदारीचा कालखंड आता सुरू झाला आहे.
...आणि मोदी गहिवरले
मोदींच्या कृपेमुळेच आपल्या सगळ्यांना या ऐतिहासिक प्रसंगातून जाण्याची संधी मिळाली, असे अडवाणी यांनी आपल्या भाषणात म्हटले होते. या मुद्द्यावर बोलताना मोदींना गहिवरून आले. ते म्हणाले, आईची सेवा ही कधीही कृपा होऊ शकत नही. ज्याप्रमाणे भारत माझी आई आहे. त्याच पद्धतीने भाजपसुद्धा माझी आई आहे. कृपा तर पक्षाने माझ्यावर केली आहे. पक्षावर कृपा केल्याचा उल्लेख माझ्या बाबतीत करू नका, असेही मोदी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search