राज्यात निवडणुका सुरू आहेत आणि ठिकठिकाणहून मतदारांच्या अनेक तक्रारी येत आहेत. राज्यातील सुमारे 74 लाख मतदारांची नावं यादीतून गहाळ करण्यात आल्याची तक्रार भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. मतदार यादींशी संबंधित अधिकारी खासगी कंत्राटदार, जिल्हाधिकारी आणि उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे मतदार यादीतून 74 लाख मतदारांची नावं गहाळ झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या वतीने पक्षाचे विधी आणि न्याय सेलचे सहसंयोजक ऍड. विनोद तिवारी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
राज्यभरात 60 लाख नोंदणीकृत मतदारांची नावं यादीतून गहाळ झालीत. 14 लाख नव्या मतदारांची नावं ऑनलाईन नोंदणी करूनही याद्यांमध्ये समाविष्ट केली गेली नाहीत. त्यामुळे या सर्व घोळाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऍड, विनोद तिवारी यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
गेल्या 10 आणि 17 एप्रिलला झालेल्या मतदानात राज्यात अनेक ठिकाणी मतदारांची नावं गहाळ झाल्याचे प्रकार उघड झाले.अशा प्रकारे प्रत्येकच लोकसभा मतदारसंघात सरासरी दीड लाख मतदारांची नावं कोणतीही पुर्वसूचना न देता गहाळ झाली, असं या तक्रारीत म्हटलं आहे.
भाजपची तक्रार
- 74 लाख मतदारांची नावं गहाळ झाल्याची तक्रार
- 60 लाख नोंदणीकृत मतदारांची नावं गहाळ
- 14 लाख नव्या मतदारांची नावं गहाळ
- प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 1.5 लाख नावं गहाळ
पुणे : मुंबई हायकोर्टात जनहितयाचिका दाखल
दरम्यान, पुणे शहर लोकसभा मतदार संघातल्या हजारो मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आल्याने किंवा गायब झाल्याने या मतदारांना 17 तरखेला मतदान करता आलं नव्हतं. याप्रकरणी मुंबई हायकोर्टात जनहितयाचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातले सामाजिक कार्यकर्ते, प्रताप गायकवाड यांनी ही याचिका दाखल केली आहे. मतदारांची नाव वगळण्यासाठी जबाबदार असणार्या सरकारी अधिकार्यांवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा