९/२१/२०१४

पोरबाजार; निव्वळ बाजार!








कलाकार : अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, अनुराग वरळीकर, स्वरांगी मराठे, सखील परचुरे, धर्मज जोशी, सत्या मांजरेकर, विकास पाटील, शंतनु गंगा
वणे, चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे.
निर्माता : एआरडी एंटरटेन्मेंट
दिग्दर्शक : मनवा नाईक
संगीत : शैलेंद्र बर्वे
वेळ : 135mins
सिनेमा प्रकार : Drama




मराठीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवे दिग्दर्शक येऊ लागले आहेत. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना रीतसर शिक्षण, अनुभव आणि समज यांद्वारे या तरुण दिग्दर्शकांनी अनेक महत्त्वाच्या सिनेमांची निर्मिती केली आहे. म्हणूनच अशा नव्या दिग्दर्शकांकडे सिनेरसिकांचं विशेष लक्ष असतं. या निमित्ताने नवा विचार, नवी मांडणी, गोष्ट सांगण्याची नवी पद्धत पाहायला मिळू लागली आहे. अशा 'सुगी'च्या दिवसांमध्ये मनवा नाईक या अभिनेत्रीने 'पोरबाजार'द्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. सिनेमा, टीव्ही, नाटक या तीनही माध्यमात काम केल्यानंतर ती दिग्दर्शनात उतरली आहे. दिग्दर्शन करण्यापूर्वी तिने न्यूयॉर्कमध्ये दिग्दर्शनाचं रितसर शिक्षणही घेतलं आहे. अशी पूर्ण तयारी करून तिने 'पोरबाजार' बनवला आहे. साहजिकच या दिग्दर्शिकेकडून, सिनेमाकडून अपेक्षा वाढतात. मात्र या बाळगलेल्या अपेक्षांची पूर्ती 'पोरबाजार' करत नाही. यातली सर्व प्रस्थापित कलाकारांची मुलं.. अभिनेता स्वप्नील जोशीला घेऊन बनवलेलं एक आकर्षक गाणं.. सगळ्यात शेवटी फरहान अख्तरचं घडणारं दर्शन हे सर्व एकिकडे आणि या सिनेमातून दिग्दर्शिका मांडू पाहणारा विषय दुसरीकडे.. असे याचे सरळ दोन भाग पडतात. विषयाची मांडणी सखोल होण्याऐवजी ती 'प्रमोशनल' वाटू लागते. कुतूहलजनक कथा.. पण तिचा झालेला असंतुलित कथाविस्तार.. बाळबोध पटकथा, अपवाद वगळता मुलांचा 'पुस्तकी' अभिनय आणि जुन्या धाटणीचं दिग्दर्शन यांमुळे या विषयाचं गांभीर्य कमी होऊन तो केवळ 'बालचित्रपटा' पुरता उरतो. 'चाइल्ड ट्रॅफिकिंग' अर्थात बालतस्करीसारख्या अत्यंत महत्त्वाचा विषय या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. खुद्द दिग्दर्शिका ही समस्या जाणून आहे. आई, मीना नाईक यांच्यासह बालहक्क, बालतस्करी अशा महत्त्वाच्या विषयांवर तिने काम केलं आहे. तात्पर्य, एकूण या विषयाचं गांभीर्य तिला पुरेपूर आहे. पूर्णतः माहीती असलेल्या विषयावर सिनेमा बनवण्याचा घाट घालताना त्याची मांडणी मात्र विषयाची गरज ओळखून झालेली नाही.

नुकत्याच कॉलेजमध्ये जाऊ लागलेल्या अजय, मंजिरी, विशाल, रागिणी, समर या पाच जणांची ही गोष्ट आहे. पाचही जणांचे स्वभाव पूर्ण वेगळे. तरीही मैत्री मात्र घनिष्ट. लेक्चर्सला दांडी मारून धमाल करण्याकडे यांचा नेहमीचा कल. अशीच धमाल करता करता एक थ्रिलिंग अनुभव घेण्यासाठी फारशी वर्दळ नसलेल्या एका कच्च्या रस्त्यावरून आपापल्या सायकली दौडवता दौडवता ही मुलं पोहोचतात एका जंगलवजा अनोळखी ठिकाणी. इथे पोहोचल्यावर धमाल करताना काही गोष्टी यातल्या काहींच्या नजरेला पडतात आणि या सगळ्या टीमसमोर एक नवं आव्हान उभं रहातं. याच आव्हानाचा सामना म्हणजे हा चित्रपट.
या गोष्टीसाठी अकरावीत शिकणारी मुलं घेणं हेच फार भारी होतं. कारण विचारातला पिढीचा फरक इथे दिसतो. म्हणजे दिसणं अपेक्षित आहे. एखाद्या प्रसंगात अडकल्यानंतर त्यातून मार्ग काढण्याचे आजच्या पिढीचे मार्ग आणि येणाऱ्या पिढचे, 'त्यांचे' मार्ग पूर्ण वेगळे असतात, असायला हवेत. हीच या गोष्टीतली गंमत आहे. त्यांना मुद्दाम दिलेली स्वभाव वैशिष्ट्य वेळोवेळी त्या व्यक्तिरेखेतून पाझरताना दिसायला हवीत. इथे आत्ता तपशिलात सांगणं योग्य ठरणार नाही. कारण त्यामुळे सिनेमाची गोष्ट फुटेल. पण उदाहरणादाखल, सिनेमाच्या शेवटी शेवटी घडत असणारा सगळा प्रकार यातली एक मुलगी मोबाइलवर शूट करते आणि तत्काळ सोशल साइटवर टाकते. त्यानंतर पालक जागे होतात. पोलीस सतर्क होतात वगैरे वगैरे.. आता मुद्दा असा की हे या गोष्टीत फार आधीही करता आलं असतं. म्हणजे या मुलांचे एकूण स्वभाव पाहता त्यानी सुरुवातीला तेच करणं अपेक्षित आहे. खरी लढाई त्यानंतरची. पण तसं होत नाही. अशावेळी सिनेमा पाहताना प्रश्न पडत रहातात. एकाच शहरातली १५ ते २० मुलं हरवूनही त्याची शहरात कुठेच चर्चा होत नाही. हॉस्टेलमधल्या गायब झालेल्या मुलीचं पुढे काय होतं, थिएटरमध्ये मूल गेल्यानंतर हंबरडा फोडणाऱ्या पालकांच्या नशिबी नेमकं काय येतं, तेही यात दिसत नाही. ना या अपहृत मुलांची पार्श्वभूमी समजते, ना हा सगळा प्रकार घडत असताना शहरातल्या वेगवेगळ्या स्तरातल्या प्रतिक्रिया इथे उमटतात. पोलिस यंत्रणेला गुंगारा देणं.. मूल पळवल्यानंतरचा या टोळीचा थरार.. त्यांचा माग काढताना मुलांना आलेले अनुभव त्यांतून त्यांना येत गेलेलं शहाणपण असा थरारक 'चित्र'पट न दिसता या सिनेमातून विषयाला केवळ 'लेक्चरी' स्पर्श केला जातो. बाळबोध पटकथा, पुस्तकी संवाद यांमुळे या सिनेमाचं 'वय' आणखी लहान झालं आहे. तात्पर्य, 'पोरबाजार' वाईट्ट सिनेमा नक्कीच नाही. पण शालेय वयात असताना जे सिनेमे शाळेत हटकून दाखवले जायचे ना, त्यांची आठवण होते. अगदीच नॉस्टॅल्जिया हवा असेल तर हा 'पोरबाजार' पाहा. नाहीतर सत्यजित रेंचा 'फेलूदा' वाचता येईल. आपला 'फास्टर फेणे'ही आहेच की!




-MaharashtraTimes

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search