मुंबई : मेट्रो सुरु झाल्यानं घाटकोपर ते वर्सोवा दरम्यानच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हाच दिलासा ठाण्यापर्यंतच्या प्रवाशांना देण्यावर सरकारचा विचार सुरू झाला आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पाचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्यासंदर्भातला अहवाल महिन्यभरात सरकारला मिळेल असं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत सांगितलं आहे.
एकूण 32 किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी 22 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रोच्या विस्तारासंदर्भातली घोषणा येत्या 15 ऑगस्टला होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. पण ठाणे शहरासाठी स्वतंत्र मेट्रो प्रकल्प आणणं अशक्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
रेल्वेच्या तांत्रिक समितीद्वारे मेट्रोचा ठाण्यापर्यंत विस्तार करण्यासंदर्भात अहवाल तयार करण्याचं काम सुरू आहे. या मार्गावर 29 स्टेशन्स असतील असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ठाण्यातल्या आमदारांनी मेट्रोच्या विस्तारासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते.
टिप्पणी पोस्ट करा