१/२५/२०१५

दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !





कोमेजून निजलेली एक परीराणी
उतरलेले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !


आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा करी लोकलची वारी
रोज सकाळीस राजा निघताना बोले
गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परी येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी
खऱ्याखुऱ्या परी साठी गोष्टीतली परी
बांधीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

ऑफिसात उशिरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय काय वाटे
आठवांसोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठुनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मीही पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रुसावे नी भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी

उधळत, खिदळत, बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हासुनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरी सुद्धा दोघे जण दंगा मांडू असा
क्षणा क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला !

दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ मऊ दूध-भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी

कुशी माझी सांगत आहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू-खाऊ न्हाऊ-माखू घालतो ना तुला
आई परी वेणीफणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबा सुद्धा खुळा
तो ही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला !

बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटूलुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त, जवळ पहायचंच राहिलं

असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशिरानं येतो
बालपण गेले तुझे गुज निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळी मधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग ? 
मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग ?
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यांमध्ये ?






Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search