१०/०२/२०१४

गेल्या १० वर्षांतलं भुजबळांच्या 'संपत्ती'चं भरभक्कम बांधकाम!




राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते... छगन भुजबळ... संपत्तीच्या बाबतीतही ते हेवीवेटच आहेत... विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं भुजबळांना पुन्हा एकदा आपली संपत्ती जाहीर करावी लागलीय. यानिमित्तानं भुजबळांची संपत्ती गेल्या दहा वर्षांत केवढी वाढलीय, हे बघितल्यानंतर तुमच्यासमोर त्यांच्या बांधकामाच्या 'भरभक्कम'पणाची प्रचिती नक्कीच येईल.
पाच वर्षांनी एकदा येणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवात कुणाची म्हैस किती पाण्यात हे तर कळतंय...  पण तुमच्या-आमच्या लोकप्रतिनिधींची संपत्ती कशी वाढता वढता वाढली... तेही यानिमित्तानं कळतं.... नाशिक जिल्ह्यातल्या येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्या संपत्तीत पाच वर्षांत जवळपास तिपटीने वाढ झालीय. २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळात भुजबळांची संपत्ती १ कोटी ९१ लाख रुपयांवरून थेट २१ कोटींपर्यंत गेलीय. 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीला समोरं जाताना भुजबळांनी सादर केलेल्या विवरणात दिंडोरी तालुक्यातल्या इंदोरे शिवारात १५ एकर शेत जमीन, नाशिक शहरात १.३० एकर जमीन, २ भूखंड, मुंबईमध्ये ३ सदनिका, वाशी बाजार समिती आणि माझगावमध्ये प्रत्येकी एक दुकान, नवी मुंबईमध्ये बंगला या सगळ्याचा समावेश आहे. तर स्थावरमालमत्तेमध्ये ८ कोटी ६१ लाख ८९ हजार रुपयांची मालमत्ता भुजबळांच्या नावे आहे.... 
पत्नीनं मात्र याबाबतीत भुजबळांना मागे टाकलंय. पत्नीच्या नावे ११ कोटी ६४ लाख ७८ हजारांची संपत्ती आहे. पत्नीच्या नावावर ३५ लाखांचं सोनं तर भुजबळांकडे स्वतःकडे १६ लाखांचं सोनं आहे. वाहन खरेदीत भुजबळांनी प्रगती केलीय. २००४ मध्ये त्यांच्याकडे एकही वाहन नव्हतं तर आता  एक ट्रॅक्टर आणि एक पिक अप गाडी भुजबळांच्या नावावर आहे. 
संपत्तीच्या बाबतीत पंकज भुजबळ यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलंय. पंकज भुजबळांच्या कुटुंबीयांकडे जवळपास २० कोटी ४९ लाख ६ हजारांची मालमत्ता आहे. 
बरं... ही सगळी माहिती आहे केवळ अर्जाच्या विवरणपत्रातली...! संपत्तीचे हे 'डोंगर' दहा वर्षांत कसे बांधले जातात, हे मात्र सर्वसामान्यांसाठी कोडंच राहणार आहे.  


Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search